Ajay Kandewar,Wani : शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांची अमृत २.० योजना सुरू करण्यात आली होती.मात्र, या योजनेच्या कामाची सद्यस्थिती पाहता आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. तब्बल १४० कोटींच्या या कामाला दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही. निर्धारित कालावधीत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मात्र ५० ते ६० टक्क्यांच्या आसपासच काम झाल्याची माहिती आहे. मग उर्वरित काम नेमके कधी पूर्ण होणार? कोट्यवधींचा ठेका घेऊनही कामाचा वेग एवढा संथ का? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि नियोजनाची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. मात्र, दोन वर्षांच्या कालावधीतही कामाचा अपेक्षित टप्पा गाठता आला नसेल, तर ही बाब निश्चितच गंभीर आहे. काही किलोमीटरचे काम करून उर्वरित कामासाठी किती काळ प्रतीक्षा करायची?ठरलेली मुदत संपत असताना कामाचा वेग वाढविण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या? मुदतवाढ किंवा दंडात्मक कारवाईबाबत प्रशासनाची भूमिका काय आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याशी निगडित असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत नागरिकांना केवळ कागदोपत्री प्रगती नको, तर प्रत्यक्ष परिणाम हवा आहे. १४० कोटींच्या योजनेत काम अर्धवट ठेवण्याचा हा आणखी एक प्रताप म्हणायचा की नियोजनाचा नमुना?


