Ajay,Wani : लालपुलिया ते चिखलगाव, सोमनाळा तसेच राजूर रिंगरोड परिसरातील जीवघेणे कोळसा प्लॉटमुळे निर्माण होणारे प्रदूषण याविरोधात आज लढा संघटनेसह पाच संघटना राजूर बंद आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. विशेष म्हणजे, राजूर रिंगरोडवर नव्याने कोळसा प्लॉट उभारण्याचे सुरू असलेले प्रयत्न हाणून पाडण्याची आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. या प्रस्तावित कोळसा प्लॉटला कोणत्याही शासकीय विभागाने कोणतीही परवानगी देऊ नये, अशी थेट मागणीही या आंदोलनातून करण्यात येणार आहे. कोळशाने भरलेल्या वाहनांमुळे यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत असून, धुळीच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. वर्षानुवर्षे हा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांचा संयम आता संपला असून, संपूर्ण परिसरातून कोळसा प्लॉट हटविण्याची मागणी जोर धरत आहे.

लढा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खांजोडे यांच्या नेतृत्वाखाली गावकरी आणि आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पाच संघटना या लढ्यात सहभागी होणार आहेत. केवळ नोटिसा देऊन किंवा तात्पुरत्या कारवाया करून नागरिकांची दिशाभूल करू नका; जुन्या कोळसा प्लॉटवर कायमस्वरूपी कारवाई करा आणि नव्या कोळसा प्लॉटला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नका! असा थेट इशारा महसूल विभागासह संबंधित प्रशासनाला देण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्यापेक्षा कोळसा व्यापाऱ्यांचे हित महत्त्वाचे आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. जोपर्यंत कोळसा प्लॉट बंद करण्याबाबत ठोस निर्णय होत नाही आणि नव्या प्लॉटचे प्रयत्न कायमचे थांबत नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा ठाम निर्धार प्रवीण खांजोडे यांनी व्यक्त केला आहे. आता प्रशासन या जनआक्रोशाची दखल घेणार की पुन्हा आश्वासनांवरच बोळवण करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


