Ajay Kandewar, वणी :- तालुक्यातील चिखलगावात भोंगळ ग्रामपंचायतीविरोधात अखेर युवकांचा संयम सुटला असून, “अतिक्रमण हटवा नाहीतर प्रशासन हटवा!” या घोषणांनी आज गाव दणाणून गेलं.ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून गावातील सार्वजनिक जागा, रस्ते आणि शासकीय भूखंडांवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाने कानाडोळा केला. उलट सत्ताधाऱ्यांना संरक्षण देत “सत्तेचा गैरवापर” करून बेकायदेशीर बांधकामांना मूकसंमती देण्यात आली,अशी ग्रामस्थांची तीव्र नाराजी आहे. जनतेच्या मालकीच्या जागा खासगी लोकांच्या ताब्यात जात असताना प्रशासन झोपले आहे का?” असा सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे.गावातील प्रमुख चौक, शाळेजवळील जागा आणि रस्त्यांच्या कडेला उभारलेल्या बांधकामांमुळे नागरिकांना वाहतूक आणि स्वच्छतेच्या गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्व स्थितीला जबाबदार असलेल्या ग्रामपंचायतीला आता जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.उपोषणकर्त्यांचा ठाम निर्धार आहे की अतिक्रमण पूर्णपणे हटवून सार्वजनिक जागा मुक्त केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. ग्रामपंचायतीसमोर युवकांनी ठिय्या धरत घोषणा दिल्या आणि प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनात रोहन विरारकर, रोशन ढुमणे, द्रविड रंगणकर आणि गौरव डवरे हे युवक अग्रभागी असून, त्यांना ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, या आंदोलनाकडे राजकीय नेते आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. आमदार-खासदार आता खरोखर हस्तक्षेप करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.चिखलगावातील या आमरण उपोषणाने तालुक्यात खळबळ उडवली असून, ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार जनतेसमोर उघडा पडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

