Ajay kandewar, Wani : वणी विधानसभा क्षेत्रासह मारेगाव व झरी-जामणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या शेकडो रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. एका बाजूला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी सातत्याने निवेदने, तक्रारी, प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत २ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयातच प्रतीकात्मक शाळा भरविण्याचा इशारा दिला होता, तर दुसऱ्या बाजूला आमदार संजय देरकर यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा, नियम २९३ अंतर्गत चर्चा आणि मुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्र्यांकडे प्रत्यक्ष पाठपुरावा करून हा प्रश्न शासनाच्या केंद्रस्थानी आणला. या दुहेरी दबावानंतर प्रशासनाने शिक्षक उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत २०७ शिक्षक स्वयंसेवकांच्या दहा महिन्यांच्या कंत्राटी नियुक्तीस प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासाठी रु. १.५५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २० टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार वणी तालुक्यासाठी ४७, मारेगावसाठी ४१ आणि झरी-जामणीसाठी ५२ शिक्षक स्वयंसेवक उपलब्ध होणार असून, विशेषतः खाणबाधित, आदिवासी व दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात भरून निघणार आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेला अध्यापनाचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..
शिक्षक भरतीच्या प्रश्नावर प्रशासनाला सातत्याने धारेवर धरणारे संजय निखाडे यांचे आंदोलन आणि शासनस्तरावर प्रभावी राजकीय पाठपुरावा करणारे आमदार संजय देरकर यांच्या प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे.

