वणी : ‘वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा’ हे जयंत साठे लिखित समीक्षणात्मक पुस्तक असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तीन फेब्रुवारी 2023 रोजी मलेशिया येथील आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. उत्तम अंभोरे हे असून त्यांची ह्या ग्रंथाला प्रास्ताविका आहे.
ते मराठवाडा विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन मंडळाचे संचालक असून वामनदादांच्या गीतांना यथोचितपणे बांधणारा आंबेडकरवादी ग्रंथ म्हणून या पुस्तकाकडे पहावे लागेल असे ते म्हणाले. जयंत साठे यांनी वामनदादा कर्डक यांच्या निवडक गीतांचे विवेचन आणि विश्लेषण करून आंबेडकरोत्तर पार्श्वभूमी गृहीत धरून मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समीक्षक संदेश ढोले यांनी या पुस्तकाचे आकलन केले आहे. आदर्श समाज व्यवस्थेच्या पुनर्रचनेचा नीतिमय जागर म्हणून या पुस्तकाकडे पहावे लागेल असे ते म्हणतात. ज्येष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर यांची प्रस्तावना असून त्यांनी हे पुस्तक म्हणजे वामनदादांच्या गीतातील आंबेडकरवादी वैचारिक ऊर्जेचा खजिना असल्याचे प्रतिपादन केले.
ब्लर्ब समीक्षक, कवी व विचारवंत डॉ.अशोक पळवेकर यांचे आहे. ते म्हणतात वामनदादांनी आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र कर्तुत्व व विचारांच्या मांडणीतून केलेल्या मानवी मूल्यांचा जागर उजागर करणारे हे पुस्तक आहे. मुखपृष्ठ जागतिक चित्रकार बळी खैरे यांचे आहे. हे पुस्तक नोशन प्रेस डॉट कॉम या चेन्नईच्या जागतिक कीर्तीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले असून, हे पुस्तक वाचकांना अॅमेझोनवर उपलब्ध होईल.