अजय कंडेवार,Wani:- लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व इंडिया आघाडीने संविधानाबाबत खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल केली. या वेळी महाविकास आघाडी लाडकी बहिण योजना बंद होणार असा खोटा प्रचार करत आहे.मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणूक झाली. मात्र तिथे आतापर्यंत लाडली बहिण योजना बंद झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात देखील ही योजना बंद होणार नाही, ही नरेंद्र मोदी यांची गॅरन्टी आहे. त्यामुळे या वेळी खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी शासकीय मैदानात विजयी संकल्प शंखनाद सभेत मतदारांना केले. आज आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्त रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर शासकीय मैदानात विजयी संकल्प शंखनाद सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
भाजपचे उमेदवार व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी ढोलताशाच्या गजरात संपूर्ण वणी शहरात रॅली काढण्यात आली. रॅलीला संपूर्ण मतदारसंघातून कार्यकर्ते, महिला आणि समर्थक पोहोचले होते. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅली व उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खास मध्य प्रदेशहून कॅबिनेट मंत्री प्रल्हाद सिंह पटेल वणी येथे आले होते.सकाळी 11 वाजेपासूनच कार्यकर्ते व समर्थकांनी शासकीय मैदान येथे रॅलीसाठी गर्दी केली होती. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. ढोलताशा, साउंड सिस्टम, पारंपरिक गोंडी वाद्यांच्या गजरात निघालेली ही रॅली शासकीय मैदान ते टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, काठेड ऑइल मिल, सुभाषचंद्र बोस चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक असा मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयासमोर दाखल झाली. दरम्यान ठिकठिकाणी चौकात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. रॅलीत सुमारे 8 ते 10 हजारांची उपस्थिती होती, असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. रॅलीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शासकीय मैदानात सभा पार पडली. यावेळी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले.