Ajay Kandewar,वणी:- माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या प्रचार सभेला शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी शिक्षण अधिकारी उत्तमराव गेडाम, माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या किरण देरकर, संध्या बोबडे, साधना गोहोकार यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. आमदार सुधाकर अडबाले यांनी महायुती सरकारने देशाची व महाराष्ट्राची काय अवस्था केली याची विस्तृत माहिती आपल्या भाषणातून दिली. महायुती सरकारने लोकशाही प्रधान देशात हुकूमशाही पद्धतीने राज्य कारभार चालविला. एका पक्षाचं सरकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात सत्तेचा वापर केला. महाराष्ट्रात त्यांनी एकाधिकारशाही गाजविली. भारत किंवा महाराष्ट्र सरकार न म्हणता ते भाजप सरकार म्हणतात. या सरकारने शिक्षण क्षेत्राचं पार वाटोळं केलं आहे. शिक्षक भरतीचे सर्व अधिकार मंत्रालयाकडे राखून ठेवले आहेत. सरकारी शाळांचे खाजगीकरण केले जात आहे. शिक्षणाचे बाजारीकरण केले जात आहे. नोकर भरतीवर अंकुश लावण्यात आला आहे. कंत्राटी पद्धतीने शासकीय पदे भरली जात आहे. सुशिक्षित बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. युवकांच्या हाताला कामे नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. या सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं आहे. आणि व्यापारी मित्रांना मात्र मालामाल केलं आहे. व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं कर्ज माफ केलं जातं. पण जगाच्या पोशिंद्याचं कर्ज माफ करण्याकरिता यांची जीभ वळत नाही. त्यामुळे आता यांनाच विचारावंसं वाटतं की कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. महागाईने जनता होरपळत आहे. आणि हे केवळ जातीचं राजकारण करण्यात गुंग आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात जातीयतेचं अवडंबर माजविण्याचं काम या सरकारने केलं आहे. गरिबी व लाचारीत खितपत ठेवण्याकरिता मोफत राशन दिलं
पण स्वाभिमानाने जगता यावं म्हणून युवकांना रोजगार दिले जात नाही. आणि म्हणूनच आता सुज्ञ मतदारांनी विचार करावा की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना का निवडून द्यायचं. कारण परिस्थिती तुमच्या समोर आहे. आधुनिक महाराष्ट्राची ओळख बदलण्यापूर्वी मतदारांनी सावध व्हावं, असे उद्बोधनात्मक विचार आमदार अडबाले यांनी या जाहीर प्रचार सभेतून व्यक्त केले.
यावेळी आशिष खुलसंगे यांनी आपल्या भाषणातून विद्यमान आमदारांच्या विकासकामांचा खरपुच समाचार घेतला. मतदार संघाचा विकास किती केला व स्वतःचा विकास कसा साधला यावर त्यांनी सडेतोड प्रश्न उपस्थित केले. ग्रामीण भागाची दशा आजही तशीच आहे. ग्रामीण भागात आजही रस्ते नाहीत. गावात पिण्याच्या पाण्याचे ऑरो लावले, पण काही गावातील ऑरोत अजूनही पाणी आले नाही. प्रथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अतिशय दयनीय आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळतांना दिसत नाही. वणी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा विषय अजूनही खितपत पडला आहे. जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. काही जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळा तर बंद पडल्या आहेत. शिक्षण व आरोग्याच्या सुविधा तोडक्या आहेत. मग काय मलाई लाटण्याच्या कामांनाच विकास म्हणायचं, असे प्रश्न त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केले.किरण देरकरयांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले.
वामनराव कासावार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, हे सरकार पैसा व संपत्तीच्या बळावर महाराष्ट्रात आले. या सरकारचे धेय्य धोरण व दृष्टिकोन पूर्णतः विसंगत आहे. जनसामान्यांचा विचार करणारं हे सरकार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं हे सरकार नाही. युवकांना रोजगार देणारं हे सरकार नाही. केवळ जातीजातींमध्ये वाद निर्माण करणारं हे सरकार आहे. एका सुधीरने नाते संबंधाविषयी अपशब्द वापरले होते. तर दुसऱ्या सुधीरने एका जाती विषयी गरड ओकली आहे. देशातील व महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचं काम या पक्षातील नेते व प्रवक्ते करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून हे सरकार हद्दपार करणं गरजेचं झालं आहे. त्याकरिता वणी मतदार संघातील शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार संजय देरकर यांना बहुमतांनी विजयी करणे गरजेचे आहे. शिवसेनेच्या मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांचा विजय साकार करण्याचे आवाहन वामनराव कासावार यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते