Ajay Kandewar,Wani:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त वणी शहरात यंदा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून हा सोहळा अत्यंत भव्य आणि दिमाखात साजरा केला जाणार असून शहरात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकित पुतळ्यासमोर कार्यक्रम होणार असून सकाळपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्सवाला प्रारंभ होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास भव्य दिव्य जलाभिषेक व दुग्धाभिषेकाने होईल. त्यानंतर सामूहिक महाआरती, फुलांची उधळण आणि शिवचरित्रावर आधारित प्रेरणादायी संदेशांद्वारे उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि भव्य फलकांद्वारे शिवकालीन वातावरण साकारले जात आहे. नामांकित ढोल-ताशा पथकांच्या गजरात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात संपूर्ण परिसर दुमदुमणार आहे.
यावर्षीचा सोहळा अधिक हाईटेक स्वरूपात साजरा होणार असून अत्याधुनिक लेझर लाईट शो, साउंड सिस्टीम आणि भव्य आतिषबाजी हे मुख्य आकर्षण ठरणार आहे. युद्धप्रसंग आणि शिवकालीन इतिहास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी उपस्थित राहून शिवजयंतीची शोभा वाढवावी, असे आवाहन मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.

