Ajay Kandewar,Wani : महाराष्ट्राची शान असलेली पारंपरिक लोककला लावणी रविवारी सायंकाळी ६ वाजता चंद्रपूर शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली. सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ यांच्या पुढाकाराने व पी .एस आंबटकर यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्थेने अथक परिश्रम केलेल्या या भव्य उपक्रमाने जागतिक पातळीवर महाराष्ट्राचा गौरव वाढवला.
या ऐतिहासिक कार्यक्रमात विविध शाळा व संस्थांमधील तब्बल २,७०० विद्यार्थिनी व महिलांनी एकाच वेळी ७ मिनिटे ३० सेकंदांत ७ लावणी नृत्यांचे सुसंगत सादरीकरण करत विश्वविक्रम प्रस्थापित केला. पारंपरिक नऊवारी साड्या, ठसकेबाज हालचाली आणि तालबद्ध ठेक्यांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. शिस्तबद्ध नियोजन, नेमकी वेळ आणि कलात्मक सादरीकरण यामुळे हा विक्रम अधिकच भव्य ठरला.
या जागतिक विक्रमाची नोंद १८० देशांत होत असून, संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. लोककलेला जागतिक व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा देणारा ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांतून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जगासमोर मांडली जाईल, असा विश्वास सोमय्या ग्रूपचे संचालक पी एस. आंबटकर यांनी व्यक्त केला.

