Ajay ,Wani:- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदी व शासनाच्या संबंधित निर्णयानुसार दि. १ जानेवारी २०११ पर्यंतची शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमाकुल करण्याच्या प्रक्रियेसाठी स्थानिक प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या सूचनेनुसार राजूर ग्रामपंचायत सचिव एस.टी. शेंडे यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. मौजा राजूर येथील वेकोली, रेल्वे, महसूल, गावठाण व इतर शासकीय जागेवरील संबंधित नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपला प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे जमा करावा असे जाहीर आव्हान करण्यात आले.
प्रस्तावासोबत १ जानेवारी २०११ पूर्वीचे मतदार यादीतील नाव, वीजबिल, मालमत्ता कराची पावती अथवा निवासी पुरावा, ग्रामपंचायतीचा नमुना ८ उतारा, अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना, उपग्रह छायाचित्र, मागील एका वर्षातील रहिवासाचा शासकीय पुरावा आणि जागेचा सद्यस्थितीतील जिओटॅग फोटो आदी उपलब्ध पुरावे जोडणे अपेक्षित आहे. अर्जाचा नमुना गावाच्या ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याची झेरॉक्स काढून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे सचिव एस.टी. शेंडे यांनी सूचनेत स्पष्ट केले आहे. संबंधित नागरिकांनी दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात प्रस्ताव जमा करणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ग्रामपंचायत स्तरावर अतिक्रमण नियमाकुल करण्याचा कोणताही अंतिम निर्णय घेतला जाणार नाही. शासनाच्या जीआरनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज व प्रस्ताव स्वीकारणे आणि ते पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती, वणी येथे सादर करणे, ही स्थानिक प्रशासनाची भूमिका आहे. प्रस्तावाची छाननी, पात्रता व अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबतचा अंतिम निर्णय शासनाच्या लागू नियम व निकषांनुसार सक्षम प्राधिकरणाकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर केल्याने अतिक्रमण तत्काळ नियमाकुल झाल्याचे समजता येणार नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.

