अजय कंडेवार, Wani:-मुकूटबन येथील सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामातील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि बेजबाबदार कामकाजाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारांविरोधात बुधवार, २० मे रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन दुपारी १२ वाजता मुकूटबन बस स्टँड समोर होणार असून परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रस्ता काही ठिकाणी आधीपासूनच उखडू लागला असून कामामध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. “रस्ता बांधकामाच्या नावाखाली जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार सुरू आहे का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तर संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून निकृष्ट कामे खपवून घेतल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वणी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडणार असून, रज्जाक पठाण, प्रमोद थेरे, किशोर गोंलावार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. “निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका आणि कामाची उच्चस्तरीय चौकशी करा,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.

