Ajay,Wani : बोधगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत वणीतील उपासकांनीही आपला सहभाग नोंदविला आहे. विजय नगराळे यांच्या नेतृत्वाखाली विजय नगराळे, संजय तेलंग, किशोर चहांदे, भारत कुंभारे, अनिल थूल आणि रवी कनाके हे शुक्रवारी (दि. २१) सकाळी ९ वाजता आंदोलनासाठी रवाना झाले. महाबोधी महाविहाराचे बौद्ध समाजाच्या दृष्टीने असलेले ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, या मुक्तीच्या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर वणीतील उपासकांनीही प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका घेतली.
रवानगीपूर्वी माजी नगराध्यक्ष सुरेश रायपूरे यांनी उपासकांचे पुष्पहार घालून स्वागत केले. सोनारखंन यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची भूमिका मांडली, तर पुरुषोत्तम पाटील यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी आणि पुढील रूपरेषा स्पष्ट केली. यानंतर पुरुषोत्तम पाटील, जीवने आणि सुरेश रायपूरे यांच्या हस्ते पंचशील ध्वज दाखवून उपासकांना रवाना करण्यात आले.

