Tuesday, July 14, 2026
HomeBreakingमजुराच्या लेकीची गरुडझेप; युतिका कोंकटवार BBA प्रथम वर्षात टॉप.....

मजुराच्या लेकीची गरुडझेप; युतिका कोंकटवार BBA प्रथम वर्षात टॉप…..

अजय, वणी : परिस्थिती कितीही कठीण असली, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ असेल तर यशाला गवसणी घालता येते, हे राजूर येथील युतिका समय्या कोंकटवार हिने सिद्ध करून दाखविले आहे. शहरातील नामांकित सुशगंगा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या BBA प्रथम वर्षाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात युतिकाने ७.९१ SGPA मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. एका कष्टकरी मजुराच्या लेकीने मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयासह राजूर गावाच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे.

युतिकाचे वडील समय्या कोंकटवार हे कंपनीत अनेक वर्षापासून मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही त्यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. दिवसभर कष्टाची कामे करून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून घरखर्च सांभाळत दोन्ही मुलींना चांगले शिक्षण देण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. परिस्थितीसमोर हार न मानता वडिलांनी केलेल्या या संघर्षाचे चीज दोन्ही मुली सातत्याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर करत आहेत.कोंकटवार कुटुंबातील दोन्ही मुलींनी शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मोठ्या मुलीने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत अव्वल स्थान पटकावले होते. तर युतिकानेही दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुणांसह टॉप येण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर BBA अभ्यासक्रमाला प्रवेश घेताच प्रथम वर्षातच ७.९१ SGPA मिळवत तिने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. शाळा असो किंवा महाविद्यालय—कोंकटवार कुटुंबातील या दोन्ही लेकींनी प्रत्येक टप्प्यावर आपल्या कष्टकरी वडिलांच्या संघर्षाला यशाची झळाळी दिली आहे.

हातावर पोट असलेल्या एका मजुराने स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून मुलींच्या हातात शिक्षणाची पुस्तके दिली आणि त्या मुलींनीही प्रत्येक परीक्षेत अव्वल येत वडिलांच्या घामाचे सोने केले, अशी भावना राजूर परिसरातून व्यक्त होत आहे. साधनांची कमतरता ही गुणवत्तेच्या आड येऊ शकत नाही, युतिकाच्या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.युतिकाच्या यशामागे तिची कठोर मेहनत, कुटुंबाचा त्याग तसेच महाविद्यालयाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. महाविद्यालयातील दर्जेदार अध्यापन, नियमित प्रात्यक्षिके, विद्यार्थीकेंद्रित मार्गदर्शन आणि अद्ययावत शैक्षणिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व्यवस्थापन आणि संगणक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नांचे प्रतिबिंबही या निकालातून उमटले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगिनवार, उपाध्यक्ष मोहन बोनगिनवार, प्राचार्या पुष्पा राणी, विभागप्रमुख व्यंकटेश जीवन कवरासे, विभागप्रमुख नकुल कैलास मेसेकर, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी युतिकाचे अभिनंदन केले. राजूर आणि वणी परिसरातूनही या कष्टकरी वडिलांच्या गुणवंत लेकीवर कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

मजुरीच्या घामातून फुलले शिक्षणाचे स्वप्न!

स्वतःच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी समय्या कोंकटवार यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणाशी कधीही तडजोड केली नाही. रोजच्या मजुरीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर संसाराचा गाडा हाकत त्यांनी दोन्ही मुलींना शिक्षणाची संधी दिली. त्यांच्या या संघर्षाला दोन्ही मुलींनीही सातत्यपूर्ण यशाने उत्तर दिले. एका मजुराच्या घरातील दोन्ही लेकी शाळा आणि महाविद्यालयात सातत्याने अव्वल ठरत असल्याची ही यशोगाथा आज अनेक कष्टकरी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page