Ajay Kandewar,ठाणे, दि. ९ : बालकांच्या आरोग्यपूर्ण वाढीसोबतच गर्भवती व स्तनदा मातांचे पोषण, किशोरींचे आरोग्य आणि कुपोषण निर्मूलनाचा संदेश घराघरांत पोहोचविण्याच्या उद्देशाने बांधणेपाडा येथील अंगणवाडी केंद्रात पोषण अभियानाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. अभियानाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या पोषण दिंडीमधून सकस व संतुलित आहार, स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. अंगणवाडीतील बालके, माता, महिला आणि ग्रामस्थांनी दिंडीत सहभाग घेतला. यावेळी पोषण प्रतिज्ञेसोबतच गावातील प्रत्येक बालकाला सुरक्षित, निरोगी व आनंदी वातावरण उपलब्ध करून देण्याचा निर्धार करीत ‘बालस्नेही गाव’ शपथ घेण्यात आली.
पोषण अभियानाला केवळ आहारविषयक जनजागृतीपुरते मर्यादित न ठेवता पर्यावरण आणि स्थानिक पातळीवरील पोषणस्रोतांशी जोडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून अंगणवाडी परिसरात शेवगा रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. शेवग्याच्या पानांमधील पोषक घटकांचा आहारातील उपयोग स्पष्ट करून घरच्या घरी उपलब्ध होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मातृत्व वंदन योजना आणि माता-बालकांच्या आरोग्याशी संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती देत पात्र लाभार्थींनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. बालकांचे आरोग्य, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षण या तिन्ही बाबींमध्ये अंगणवाडीची भूमिका महत्त्वाची असल्याने पालकांनी अंगणवाडीशी नियमित समन्वय ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी शोभा शेलार, बाल विकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षिका उषा लांडगे यांच्यासह सर्व पर्यवेक्षिका, मदतनीस, प्रथम संस्थेचे समन्वयक, तसेच पालक, माता, महिला, ग्रामस्थ आणि अंगणवाडीतील बालके उपस्थित होती. पोषण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून कुटुंब, अंगणवाडी, आरोग्य यंत्रणा आणि ग्रामसमुदाय यांच्या समन्वयातूनच कुपोषणाविरुद्धची लढाई प्रभावी होऊ शकते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

