Ajay,वणी : तालुक्यातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीच्या खोलीकरण, पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाचा मार्ग आता प्रशस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी नदीचे महत्त्व, वाढते गाळाचे प्रमाण, पाण्याचा विस्कळीत प्रवाह आणि नदीपात्राच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पत्रव्यवहार करून या कामासाठी शासनस्तरावर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. निर्गुडा नदी ही वणी परिसराच्या धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक व पर्यावरणीय दृष्टीने महत्त्वाची असून तिच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे विजय पिदुरकर यांनी पत्रातून निदर्शनास आणून दिले.
पिदुरकरांच्या या मागणीची आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी थेट दखल घेतली असून, त्यांनी दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्र पाठविले आहे. या पत्रात निर्गुडा नदीचे आवश्यक ठिकाणी खोलीकरण, गाळ काढणे, नदीपात्राचे संवर्धन, पुनरुज्जीवन तसेच सौंदर्यीकरणाची कामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नदीच्या सर्वंकष विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून त्यामध्ये नदी पुनरुज्जीवन, जलसंधारण, तटसंरक्षण, वृक्षारोपण, सौंदर्यीकरण व पर्यावरण संवर्धनाचा समावेश करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधीच्या पत्रातून सुरू झालेला हा पाठपुरावा आता थेट जलसंपदा मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याने निर्गुडा नदीच्या संवर्धनाच्या आशा उंचावल्या आहेत. नदीपात्रातील गाळ व अडथळे दूर झाल्यास पाण्याची साठवणक्षमता आणि प्रवाह सुधारण्यास मदत होणार असून परिसरातील पर्यावरणीय संतुलनालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे पिदुरकरांच्या मागणीला मुनगंटीवारांनी दिलेली तत्काळ दखल आणि महाजनांकडे केलेला पाठपुरावा हा निर्गुडा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

