Ajay,Wani : झरि तालुक्यातील गांजा, चरस, मेफेड्रोन (MD), हेरॉईन आणि कोकीन यांसारख्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पाटण पोलिसांनी आता नागरिकांच्या सहकार्यावर भर दिला आहे. परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा वितरण होत असल्याची माहिती असल्यास ती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार API मिलिंद सरकटे यांनी केले आहे.
अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी अडकण्याचा धोका वाढत असून, अशा अवैध व्यवहारांमुळे समाजाच्या आरोग्याबरोबरच युवकांच्या भविष्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्यावर भर दिला जात आहे.
आपल्या परिसरात एखादी व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करत असेल, संशयास्पदरीत्या साठवणूक किंवा वाहतूक होत असेल अथवा अशा पदार्थांचे वितरण सुरू असल्याची माहिती मिळाली, तर नागरिकांनी ती दुर्लक्षित करू नये. संबंधित व्यक्तीचे नाव, ठिकाण, वाहन क्रमांक, व्यवहाराची संभाव्य वेळ आणि ठिकाण याबाबत उपलब्ध असलेली माहिती पोलिसांना कळवावी.नशेच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून, नागरिकांची जागरूकताही महत्त्वाची आहे.- API मिलिंद सरकटे

