Ajay,Wani : तालुक्यातील WCL कोळसा खाण प्रकल्पांमुळे बाधित शेतकरी, कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. बोरगाव (अहेरी) येथे प्रकल्पग्रस्तांची विशेष सभा घेऊन त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच परिसराची पाहणी करून प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार योग्य मोबदला,स्थानिक तरुणांना ८० टक्के रोजगार, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि कोळसा उत्खननामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण या प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या. या मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास १८ ऑक्टोबर रोजी खाण बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. या आंदोलनात प्रकल्पबाधित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दौऱ्यादरम्यान त्यांनी घुगुस येथील कोल डेपोला भेट देऊन प्रदूषण आणि रोजगाराच्या प्रश्नांची माहिती घेतली.
दरम्यान, स्थानिक डीजे व साऊंड व्यावसायिकांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणस्थळी भेट देऊन बच्चू कडू यांनी पाठिंबा दर्शविला. अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करत त्यांनी अवैध धंदे आणि साऊंड व्यवसायावरील निर्बंधांबाबत प्रश्न उपस्थित केले. यानंतर त्यांनी नीलजई ओपन कास्ट खाणीतील स्थानिक कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी भेट दिली. WCL व GRN प्रशासनाशी चर्चा करून कामगारांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करून घेतल्यानंतर उपोषणकर्त्यांनी लिंबूपाणी घेऊन उपोषण मागे घेतले. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अनिल उलमाले व धिरज राजूरकर, शहरप्रमुख शिवराज पेचे, युवासेना संघटक राहुल पारखी, अरबाज खान, चंद्रकांत घुगुल, निलेश परगंटीवार यांच्यासह कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.,

