Saturday, August 29, 2026
HomeBreakingआरोग्य शिबिरांचा महापूर की तिकीट मिळवण्याची धडपड?

आरोग्य शिबिरांचा महापूर की तिकीट मिळवण्याची धडपड?

Ajay Kandewar,Wani : तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच वणी शहरात आणि परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून तिकीट इच्छुकांनी एक नवा मार्ग शोधून काढला आहे.तो म्हणजे आरोग्य शिबिरांचा सपाटा. रक्ततपासणी, नेत्रचिकित्सा, मोफत औषधे, आरोग्य मार्गदर्शन अशा नावाखाली दर आठवड्याला वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन होत असून, या मागचा खरा उद्देश काय? असा प्रश्न आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे.

जनसेवेचा मुलामा देत लोकांना एकत्र करा, गर्दी जमवा, फोटोसेशन करा आणि “मीच तुमचा ” असा मुखवटा दाखवा हा सगळा प्रकार म्हणजे थेट जिल्हा परिषद तिकीट मिळवण्याची रणनीती असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. विशेष म्हणजे सामान्य नागरिकांनाही आता हे लक्षात येऊ लागले आहे की, आरोग्यापेक्षा राजकारणाचाच डोस जास्त दिला जात आहे.वणी शहरात सध्या “कोणत्या इच्छुकाचं कोणतं शिबिर?” याचीच चर्चा असून, नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि वरच्या पातळीवर प्रभाव निर्माण करण्यासाठी गर्दीचा आकडा दाखवण्याचा खेळ सुरू आहे. काही इच्छुक तर थेट पक्षातील वजनदार “भाऊंना” खुश करण्यासाठीच हे कार्यक्रम राबवत असल्याचे बोलले जात आहे. “गर्दी दाखवा, काम दाखवा आणि तिकीट मिळवा”हा नवा फॉर्म्युला असल्याची दबक्या आवाजात कबुलीही दिली जात आहे.

आरोग्य शिबिरे घेणे चुकीचे नाही, मात्र निवडणूक जवळ आली की अचानक उसळलेली ही समाजसेवेची लाट संशयास्पद ठरत आहे. वर्षानुवर्षे लोकांपासून दूर असलेले चेहरे आता अचानक लोकांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत असल्याने, हा खरा सेवाभाव की निव्वळ राजकीय मुखवटा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.एकीकडे तिकीटासाठी इच्छुकांची धडपड, दुसरीकडे नेत्यांना इंप्रेस करण्याची चढाओढ, आणि मध्ये सामान्य जनता असा हा सगळा राजकीय खेळ उघड होत चालला आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत “आरोग्य शिबिर घेणारा नेता” की “खऱ्या अर्थाने जनतेसोबत उभा राहणारा प्रतिनिधी” याची निवड महत्वाची ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page