Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वादग्रस्त कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून, एका महिन्यात दुसऱ्यांदा कारवाईचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी (THO) समीर थेरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, “यावेळी डॉ. राहुल चिखलीकर यांच्यावर कारवाई होणारच,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. मात्र प्रश्न असा निर्माण होत आहे की, जर पहिल्याच वेळी कठोर कारवाई झाली असती तर आज राजूर PHC मधील परिस्थिती एवढी बिघडली असती का?
THO समीर थेरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आमचे काम चौकशी अहवाल पाठविणे आहे. पुढील कारवाई करणे अथवा न करणे हे DHO यांचे अधिकार क्षेत्र आहे.” परंतु हा प्रकार म्हणजे केवळ कागदपत्रे रंगवून कारवाईचे सोंग उभे करण्यासारखा आहे. महिन्याभरात दोनदा प्रस्ताव जाऊनही संबंधित डॉक्टरांवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने DHO कार्यालयाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राजूर PHC मधील रुग्णांची सातत्याने होत असलेली हेळसांड, डॉक्टरांची अनुपस्थिती, मनमानी कारभार आणि रुग्णांना वाऱ्यावर सोडण्याचे प्रकार यामुळे गावकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. डॉ. राहुल चिखलीकर आणि डॉ. तेजस आस्वले यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर नाराजी व्यक्त होत असून, “हे दोन्ही मुजोर डॉक्टर आता गावाला नकोच,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. THO केवळ अहवाल पाठवून जबाबदारी झटकत आहेत, तर DHO कार्यालय मात्र ठोस निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. “जर पहिल्याच वेळी कठोर शिस्तभंग कारवाई झाली असती, तर या कामचुकार डॉक्टरांना एवढा माज आला नसता,” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, काही गावकऱ्यांमध्ये संशयाची कुजबुजही सुरू झाली आहे. “वारंवार तक्रारी, चौकशी अहवाल आणि प्रस्ताव असूनही कारवाई का होत नाही? या मुजोर डॉक्टरांना कुणाचे अभय आहे का? की कुठे ‘लक्ष्मीदर्शन’ झाले आहे?” अशा तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. जरी या आरोपांना अधिकृत दुजोरा नसला तरी, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अशा शंका निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आता सर्वांचे लक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) यांच्याकडे लागले आहे. राजूर PHC मधील या वादग्रस्त डॉक्टरांवर खरोखर कठोर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा फाईल दाबून वेळ मारून नेली जाणार? असा थेट सवाल जनतेतून उपस्थित केला.
पुढील भागात क्रमशः….. रट्टा -४…..

