Ajay,Wani : वणी–नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी वातानुकूलित ‘शिवाई ई-बस’ सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अजय धोबे यांनी वणी आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वणी हे व्यापारी, शैक्षणिक व प्रशासकीय केंद्र असल्याने नागपूरला दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. मात्र, या मार्गावर नियमित वातानुकूलित बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेता वणीहून सकाळी ७, ८ व ९ वाजता नागपूरसाठी ‘शिवाई ई-बस’ सुरू करावी किंवा दर दोन तासांनी वातानुकूलित बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बस उपलब्धतेची अडचण असल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करून आवश्यक बस उपलब्ध करून घ्यावी आणि या मागणीवर केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, अशी मागणीही नगरसेवक धोबे यांनी केली आहे.

