Ajay Kandewar,Wani:- मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र समोर येत आहे. एका बाजूला सहा वर्षीय चिमुकल्या चेतन चांदेकरच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही, तर दुसऱ्या बाजूला आता फिसकी जंगल परिसरात चक्क तोतया पोलिसांनी दोन वृद्धांना लक्ष्य करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
तोतया पोलीस बनून वृद्धांना लुटले; खाकीचा धाक दाखवून सोन्यावर डल्ला….
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मारोती बल्की आणि दिगंबर कळसकर हे दोन वृद्ध दुचाकीने कुंभा-देहगाव मार्गाने प्रवास करीत असताना वfiस्की जंगल परिसरात दोन अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात अडवले. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करीत त्यांनी वृद्धांना धाक दाखवला. तुमच्या अंगावर एवढे सोने घालून प्रवास करू नका, अशी भीती घालून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे, पोलिसांच्या नावाचा आणि खाकीचा धाक दाखवून नागरिकांना लुटण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली असेल, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची?
पाच किलोमीटरच्या अंतरात दोन गंभीर घटना; ठाणेदाराचा कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह…
या दोन्ही घटनांमधील भौगोलिक जवळीक अधिक चिंताजनक आहे. कुंभा-देहगाव मार्गावरील फिसकी जंगल परिसरात वृद्धांना लुटण्याची घटना घडते, तर याच मार्गाच्या परिसरातील गजाजी बोरी येथे सहा वर्षीय चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू होतो. अवघ्या काही किलोमीटरच्या परिसरात घडलेल्या या घटनांमुळे संपूर्ण भागातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.एकीकडे चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणात तीन-तीन तपास पथके आणि संपूर्ण उपविभागाची यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती असतानाही अद्याप तपासातून ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. तर दुसरीकडे आता बनावट पोलीस बनून वृद्धांना लुटण्याची घटना घडते. मग गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे का? मारेगाव ठाणेदारांचे पोलीस स्टेशन हद्दीवरील नियंत्रण कमी झाले आहे का? की गुन्हेगारांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीलाच आव्हान दिले आहे?
मारेगाव ठाणेदारांचा वचक संपला? गुन्हेगारांचे मनोबल वाढले?
पोलीस स्टेशन हद्दीत घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. गुन्हेगारांना पकडण्याऐवजी घटना घडल्यानंतर तपासाची चक्रे फिरवण्यातच पोलीस यंत्रणेचा वेळ जात आहे का? रात्रीची गस्त, संशयितांवर नजर, जंगल परिसरातील रस्त्यांवरील पेट्रोलिंग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना नेमक्या कुठे आहेत?विशेष म्हणजे, बनावट पोलीस बनून वृद्धांना लुटण्याचे धाडस गुन्हेगार करीत असतील, तर पोलिसांच्या वचकाबाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या घटनांमुळे मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख वाढतोय की काय, अशी चर्चा आता तालुकाभर सुरू झाली आहे.
यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व DYSP सुरेश दळवी यांनी लक्ष घालण्याची गरज……
सहा वर्षीय चेतनच्या मृत्यूचा तपास आणि वृद्धांना लुटणाऱ्या तोतया पोलिसांचा शोध या दोन्ही प्रकरणांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. केवळ गुन्हे दाखल करून तपास सुरू असल्याचे सांगण्यापेक्षा आरोपींचा शोध, गुन्ह्यांची उकल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे.आता प्रश्न एकच… मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांची दहशत वाढतेय की ठाणेदारांचा धाक कमी होतोय? एका चिमुकल्याच्या मृत्यूचे गूढ कायम आणि दुसरीकडे वृद्धांच्या अंगावरील सोने लुटले जाते. मग मारेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेचा हिशेब वरिष्ठ अधिकारी कधी घेणार?

