अजय कंडेवार,Wani:- हिंदू धर्मात मोक्ष प्राप्तीसाठी मृत्युपश्चात केल्या जाणाऱ्या अंतिम संस्काराला महत्व प्राप्त आहे. तो चांगला पार पाडण्यासाठी बऱ्याच गावात स्मशानभूमीमध्ये सोयी सुविधा केल्या जातात. यामध्ये स्मशानभूमीत जाणारे रस्ते दुरूस्ती, वृक्षारोपण केले जाते. मात्र, वणी तालुक्यातील राजूर या गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात चिखल, खड्डे झाल्याने मृतदेह चिखलातून स्मशानभूमीत नेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
वणी तालुक्यातील राजूर येथे गावापासून 1 किमी अंतरावर स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी, खड्डे आणि चिखल तसेच मोठ मोठे पाण्याचे तळ बनल्याने ये-जा करणे फारच जिकरीचे बनले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. याच चिखलमय रस्त्यावरून मृतदेह नेतांना नागरिकांचे हाल होत आहेत.मृतदेह घेऊन स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे ग्रामस्थांसाठी आव्हान आहे.स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे भरले असून त्याचा वापर करणे कठीण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्या खड्यात पडून स्वत:ला इजा होण्याची शक्यता असतेच. या खड्ड्यांमध्ये काही दिवसाआधी मुलीला शाळेत नेताना मुलगी व वडिलाची ट्रकमुळे मोठी दुर्घटना होता होता सुदैवाने टळली.
पूर्वी रस्ता चांगल्या स्थितीत होता. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेली रेल्वे सायडिंग वर कोल डेपो कडुन ओव्हरलोड कोळस्याची वाहतुक केली जाते. त्यामुळे रोडवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या रोडची दुरुस्ती करण्याकरीता संबंधित कंपण्याना व रेल्वे प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा याकडे ते जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिणामतः आज मृतदेह नेतांना दिसूनही संबधित प्रशासन ,कोल कंपन्या व कोल डेपो यांनी जातीने लक्ष घालून त्यावर उपायोजना करणे गरजेचे आहे. परंतु स्थानिक ग्राम प्रशासन यावर काय पाठपुरावा करताहेत आणि मूंग गिळून का आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.
• या रस्त्यासाठी संबधित रेल्वे प्रशासन व मुजोर कोल कंपन्यांनी लक्ष देण्याची मागणी –समय्या कोंकटवार (समाजसेवक)
” अनेकदा कोल कंपन्यांना सांगूनही मुजोरीने वागतात.याचाच प्रकार हा ग्रामस्थांना भोगावा लागत आहे.हिवाळ्याच्या असो पावसाळ्याचा असो अश्या दिवसातही या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे,चिखल साचल्याने, नेमकं अंत्यसंस्कारासाठी कसं जायचं? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे संबधित प्रशासनाने लक्ष देवून स्मशानभूमीत जाणारा रस्ता बांधावा, अशी मागणी समय्या कोंकटवार या नागरीकानी केली आहे.
•शेतातून काढावा लागतोय मार्ग- नागरिक
“स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून एकट्या माणसालाही चालता येत नाही. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या शेतातून मार्ग काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.”