Ajay Kandewar,Wani : शहरासह तालुक्यात सध्या तापाचा व्हायरल प्रचंड प्रमाणात पसरला असून, टायफॉईड व विविध संसर्गजन्य आजाराने रुग्णालये गजबजलीत आणि अशा काळात अनधिकृत रक्त तपासणी प्रयोगशाळांचा चांगलाच धंदा फोफावला आहे. नागरिकांची फसवणूक, चुकीचे अहवाल, जीवाशी खेळ – हे सगळं डोळ्यासमोर होतंय. मग प्रश्न असा – आरोग्य विभाग व प्रशासन नेमकं कुठे झोपलंय? अनधिकृत रक्त तपासणी प्रयोगशाळांचा अक्षरशः उच्छाद मांडला असून, नागरिकांची लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

•परवान्याविना सुरू प्रयोगशाळा.
महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडून (PMC) परवाना घेणे बंधनकारक असून, त्याशिवाय रक्त तपासणी प्रयोगशाळा सुरू करता येत नाही. तसेच एमबीबीएस किंवा एमडी पदवीधारक डॉक्टरांनाच ‘पॅथोलॉजी’ नावाने प्रयोगशाळा सुरू करण्याचा अधिकार आहे. डीएमएलटी पदवीधरांना केवळ क्लिनिकल लॅबोरेटरी चालवण्याची मुभा आहे. मात्र वणी शहरात या नियमांचा सर्रास भंग होत असून, अनेक ठिकाणी डीएमएलटी धारक थेट ‘पॅथोलॉजी’ या नावाखाली प्रयोगशाळा चालवत आहेत.अनेक अनधिकृत प्रयोगशाळा विनापरवाना कार्यरत असून, अचूक तपासणीऐवजी चुकीचे अहवाल देत आहेत. परिणामी रुग्ण उपचारासाठी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. अशा चुकीच्या तपासण्या व उपचारांमुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांची केवळ आर्थिकच नव्हे तर आरोग्याचीही मोठी फसवणूक होत आहे.
•T.H.O चा आशिर्वादाने सुरू का ?
या प्रयोगशाळा कोणत्याही अधिकृत परवान्याविना अनेक महिन्यांपासून निर्भयपणे सुरू आहेत. त्यामुळे कोणाच्या आशिर्वादाने ही बेकायदेशीर प्रयोगशाळा सुरु राहिली आहे? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक आरोग्य विभाग, नगर परिषद व प्रशासनाकडून या ठिकाणी कारवाई का होत नाही, याबद्दल जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाच्या टीएचओला वारंवार प्रतिनिधींनी फोन केला असता नेहमी अनुऊत्तरीत प्रतिसाद राहिलेला आहे त्यामुळे असं वाटतं की आरोग्य विभाग तर हवेत आहेतच पण त्या व्यतिरिक्त टी एच ओ सुद्धा चिरनिद्रेत असताना दिसत आहे. म्हणून अस म्हणायला हरकत नाही की साहेब आता नॉट रिचेबल झाले आहेत. लक्ष कमी असताना दिसत आहे.
•आरोग्य विभागावर दबाव
अनधिकृत प्रयोगशाळा बंद करण्यासाठी आणि जबाबदारांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांतून आता जोरदार मागणी होत आहे. आरोग्य विभागाने वणी शहरातील सर्व रक्त तपासणी केंद्रांची तपासणी करून अधिकृत आणि अनधिकृत प्रयोगशाळांची वास्तविक आकडेवारी तातडीने जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.सध्या ताप, टायफॉईड आणि इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना अनधिकृत रक्त तपासणी प्रयोगशाळांचा अड्डा तयार होणे ही अतिशय धोकादायक बाब आहे. त्यामुळे शासन व आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालून कारवाई करणे गरजेचे ठरले आहे.

