Ajay,Wani : स्थानिक भूमिपुत्र, युवक-युवती आणि प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आमदार तथा शिवसेना विदर्भ नेते बच्चू कडू आज, ११ ऑगस्ट रोजी वणीत दुपारी १ वाजता दाखल होत आहेत. त्यांच्या नेतृत्वात शेतकरी मंदिरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, कोळसा, माती, डोलामाईट खाणी, सिमेंट उद्योग तसेच अन्य निमशासकीय व खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, प्रकल्पबाधित कुटुंबांना न्याय मिळावा, या अपेक्षेने युवक-युवती आणि शेतकरी मोठ्या आशेने या मेळाव्याकडे पाहत आहेत. रोजगाराचा प्रश्न केवळ घोषणांपुरता न राहता स्थानिकांच्या प्रत्यक्ष रोजगाराशी जोडला जावा, अशी अपेक्षा असून बच्चू कडू या प्रश्नावर आज कोणती भूमिका मांडतात, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी वणी शहरातील शिवसेना पदाधिकारी आणि काही शिवसैनिक सर्वाधिक ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मेळाव्याची तयारी, युवक-शेतकऱ्यांशी संपर्क आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव यासाठी शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी सर्वस्वी जबाबदारी घेत विशेष मेहनत केल्याचे बोलले जात आहे. बच्चू कडूंच्या माध्यमातून भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न आक्रमकपणे पुढे यावा, तसेच वणीतील शिवसेना संघटनेला नवी ऊर्जा मिळावी, यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजचा मेळावा रोजगाराच्या प्रश्नासोबतच वणी शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची सक्रियता दाखविणारी महत्त्वाची राजकीय चाचणी ठरणार का, याकडेही लक्ष लागले

