Ajay,Wani:- कोळसा प्रदूषणाचा प्रश्न आता केवळ निवेदन, नोटीस आणि आश्वासनांपुरता उरलेला नाही. गावकऱ्यांना तात्पुरती कारवाई नको, थातूरमातूर बंदोबस्त नको आणि केवळ कागदोपत्री आदेशही नकोत; आमच्या भागातील कोळसा प्लॉटचे काम कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे, हीच आता गावकऱ्यांची ठाम मागणी आहे.लालपुलियातील प्रदूषणाविरोधात सुरू झालेला लढा आता लालपुलियापासून चिखलगाव, राजूर, निंबाळा, सोमणाळा, भांडेवाडा, सोनापूर आणि परिसरातील १३ क्षेत्रांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. कोळसा प्लॉट उभे करून गावकऱ्यांच्या माथी प्रदूषणाचा भार टाकायचा आणि विरोध झाला की नोटीस व कारवाईचा दिखावा करायचा, हा प्रकार आता चालणार नाही, अशी आक्रमक भूमिका लढा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खानजोडे यांनी घेतली आहे. आमच्या भागात प्रदूषण नकोच, मनमानी नको आणि कोळशाच्या नावाखाली चालणारे नखरेही नकोत.असा थेट संदेश देत १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजूर रिंगरोड, ग्रामीण मार्ग क्रमांक २३४ येथे भव्य रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनाचा मुख्य मुद्दा केवळ कोळसा डेपोला नोटीस बजावण्याचा नसून प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लॉटचे काम कायमचे बंद करण्याचा आहे. एकदा कोळसा प्लॉट उभे राहिले की ते हटविण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो, त्यामुळे नवीन प्लॉट वसवू देणार नाही आणि नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले प्लॉट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी संघर्ष करू, असा निर्धार खानजोडे यांनी व्यक्त केला आहे. ५०० मीटर हद्दीतील कोळसा डेपो बंद करणे, ग्रामीण मार्ग क्र. २३४ लगतचे डेपो बंद करणे, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये वार्षिक नुकसानभरपाई, ओव्हरलोड वाहतूक थांबविणे आणि राजूर रिंगरोडचे बांधकाम तातडीने पूर्ण करणे या मागण्याही आंदोलनात लावून धरल्या जाणार आहेत. लढा संघटना वणी विधानसभा, राजूर विकास संघर्ष समिती, बहुजन स्टुडंट फेडरेशन व महिला समिती, युवा हुंकार संघटना वणी आणि श्री गुरुदेव सेना वणी या पाच संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हा लढा अर्धवट विजयावर थांबणार नाही; कोळसा प्रदूषणाला कायमचा पूर्णविराम मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील कारण लढा संघटना केवळ नोटीस पाहून आनंद करून घेणार नाही तर नागरिकांच्या प्रश्न पूर्णतः दूर झाल्याशिवाय आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. आता प्रशासनाने केवळ नोटिसांचा खेळ न करता प्रत्यक्ष काम बंद करण्याची ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा १३ क्षेत्रांतील नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा या आंदोलनातून दिला जाणार आहे.

