Ajay Kandewar,Wani : पोमाडिंगी भाषण,फोटो, व्हिडिओशूट नाही तर समाजसेवेबाबत दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवत वणीचे माजी आमदार तथा लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी नंददीप फाउंडेशन, यवतमाळ यांच्या सेवाकार्यासाठी ₹५० हजारांची आर्थिक मदत प्रदान केली.
काही दिवसांपूर्वी वणी येथे आयोजित एका सत्कार समारंभात नंददीप फाउंडेशनच्या सेवाकार्याची माहिती देणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली होती. बेघर, निराधार, मनोरुग्ण, मतिमंद व उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या या कार्याची माहिती पाहून अनेक उपस्थित भावूक झाले होते. त्याच कार्यक्रमात बोलताना संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी संस्थेच्या कार्यासाठी ₹५० हजारांची मदत देण्याची घोषणा केली होती.

आपल्या घोषणेनुसार त्यांनी यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशनला प्रत्यक्ष भेट देत मदतीचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला. यावेळी त्यांनी संस्थेच्या अभिप्राय पुस्तकात प्रेरणादायी संदेशही लिहून सेवाकार्याबद्दलचा आदर व्यक्त केला.समाजातील दुर्लक्षित व गरजू घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना केवळ आर्थिक पाठबळ नव्हे, तर सामाजिक आधाराचीही गरज असते. बोधकूरवार यांच्या या सहकार्यामुळे संस्थेच्या कार्याला बळ मिळण्यासोबतच समाजातील इतर दानशूर व्यक्तींनाही सेवाकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

