Ajay Kandewar,Wani:- ऑनलाईन औषध विक्री आणि बेकायदेशीर इंटरनेट फार्मसीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने पुकारलेल्या २० मे रोजीच्या भारत बंद आंदोलनास पाठिंबा दर्शवत वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे वणी तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांसमोर आर्थिक संकट निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच बेकायदेशीर इंटरनेट फार्मसी आणि विविध ई-पोर्टलद्वारे होत असलेल्या औषध विक्रीमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होण्याची शक्यता असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना देशभरात ऑनलाईन औषध विक्री, इंटरनेट फार्मसी, नियमांबाबत अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने २० मे रोजी देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रासह वणी जिल्औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली.

यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.औषध विक्रेत्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे यांचा नेतृत्वात दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली असून नागरिकांनी आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

