Ajay Kandewar,Wani :-वणी परिसरातील एका महिला बचत गटामध्ये लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची जोरदार चर्चा सुरू असून, एका गटाच्या प्रमुख असलेल्या एका महिलेवर संशयाची सुई थेट फिरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे. गटाशी संबंधित सर्व रजिस्टर, हिशोब डायरी, कर्जाची कागदपत्रे आणि आर्थिक नोंदी संबंधित महिलेच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात असल्याने इतर महिला सदस्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जमा रक्कम आणि कर्ज व्यवहारात मोठा गोंधळ झाल्याची चर्चा सध्या रंगत असून, अनेक महिला सदस्य आता उघडपणे नाराजी व्यक्त करू लागल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, बचत गटातील लाखो रुपयांची उलाढाल संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, संबंधित महिलेने व्यवहारांचा स्पष्ट हिशोब दिलेला नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, गटातील अनेक महिलांनी आतापर्यंत शांतता राखली असली तरी आता त्या एकत्र येत कायदेशीर तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे. “आमच्या पैशांचे काय झाले?” हा प्रश्न आता महिला सदस्यांकडून उघडपणे उपस्थित केला जात असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अद्याप अधिकृत कागदपत्रे किंवा पोलिसांत तक्रार दाखल झालेली नसली तरी, संबंधित महिलेविरोधात लवकरच मोठी कारवाईची मागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गटातील सर्वसामान्य महिलांना न्याय मिळणार का, आर्थिक व्यवहारांचा खरा हिशोब समोर येणार का आणि तक्रार नेमकी कधी दाखल होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण पुढील काही दिवसांत अधिक गंभीर वळण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विदर्भ न्यूज चे आवाहन….
विदर्भ न्यूज ने आव्हान केलेले आहेत की असे कोणतेही प्रकरण जर असेल तर कागद पुराव्यासहित विदर्भ न्यूज ला थेट संपर्क करावा- 8554036501. जे सत्य आहे तिथे न्याय नक्कीच👍

