Ajay ,Wani: शहरातील नामांकित सुशगंगा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, वणीच्या BCA आणि BBA प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रथम वर्षाचा एकूण निकाल ९० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
BCA प्रथम वर्षात शिफा श्यामशुद्दीन सय्यद हिने ९.०५ SGPA मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सायन संजय आवारी याने ८.६३ SGPA सह द्वितीय, तर फाल्गुनी राजू डोंगरकर हिने ८.५८ SGPA मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. BBA प्रथम वर्षात परी उदय बोथरा हिने ८.२७ SGPA सह प्रथम क्रमांक मिळवला. अयान दिलशाद बेग आणि युतिका सामय्या कोंकटवार यांनी प्रत्येकी ७.९१ SGPA मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.महाविद्यालयातील दर्जेदार अध्यापन, नियमित प्रात्यक्षिके, विद्यार्थीकेंद्रित मार्गदर्शन आणि अद्ययावत शैक्षणिक सुविधांमुळे हे यश शक्य झाल्याची भावना गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ग्रामीण व परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व्यवस्थापन आणि संगणक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नांचेही या निकालातून प्रतिबिंब उमटले आहे.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगिनवार, उपाध्यक्ष मोहन बोनगिनवार, प्राचार्या पुष्पा राणी, विभागप्रमुख व्यंकटेश जीवन कवरासे, विभागप्रमुख नकुल कैलास मेसेकर, तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच वणी परिसरातील नागरिकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

