Wednesday, April 15, 2026
HomeBreakingसावधान वणीकरांनो! रेतीतही मापात पाप......

सावधान वणीकरांनो! रेतीतही मापात पाप……

Ajay Kandewar,Wani:- वणी परिसरात रेती विक्रीत सुरू असलेला प्रकार हा केवळ फसवणूक नाही, तर उघडउघड जनतेची लूट असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. घर, इमारत, दुकान उभारणीसाठी रेती घेणाऱ्या सामान्य नागरिकांना सरळ सरळ गंडवले जात आहे. तीन ब्रासची रेती चार ब्रास म्हणून, सात–आठ ब्रासची रेती आठ ब्रास म्हणून, आणि धक्कादायक म्हणजे आठ ब्रासची रेती थेट बारा ब्रास म्हणून विकली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

रेती वाहतूक करणाऱ्या हायवांमध्ये मापात मोठी तफावत असूनही ग्राहकांना “हाच पूर्ण हायवा आहे, एवढीच रेती बसते” असे सांगून दिशाभूल केली जाते. चुकीच्या मापाचे टेप, बनावट अंदाज, आणि फसव्या दाखवण्याच्या पद्धती वापरून नागरिकांना अंधारात ठेवले जात आहे. पैशाने घेतलेली रेती खरंच तेवढी आहे का, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे.

विशेष म्हणजे, रेतीचे दर आधीच दुप्पट झालेले असताना त्यातही मापात फसवणूक हा प्रकार जणू क्रीडाच बनला आहे. सामान्य माणूस कष्टाने कमावलेले पैसे मोजतो, पण त्याच्या अंगणात पोहोचणारी रेती मात्र मोजणीला कमीच निघते. ही लूट थांबवायची असेल तर प्रत्येक नागरिकाने जागरूक होणे गरजेचे आहे.रेती उतरवताना मोजणीची खात्री करा, संशयास्पद प्रकार दिसल्यास तत्काळ माहिती द्या. एकट्याने नाही तर एकत्र येऊनच या रेती तस्करांचा शक्कलपणा उध्वस्त करता येईल.

विदर्भ न्यूज तर्फे विशेष आवाहन करण्यात येत आहे की, अशा फसवणुकीची माहिती, पुरावे, फोटो किंवा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवा. जनतेच्या सहभागातूनच ही लूट थांबवता येईल.जागे व्हा, तपासा, आणि फसवणुकीविरोधात आवाज उठवा,कारण रेती कमी पडते, पण तुमचे पैसे पूर्ण जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page