Ajay,Wani:- वणी विधानसभेचा भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न हाती घेत शिवसेनेचे विदर्भ नेते तथा शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली वणीत झालेला भव्य रोजगार मेळावा गर्दी आणि आक्रमक राजकीय भाषणामुळे गाजला. युवक, शेतकरी, प्रकल्पबाधित आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीने शेतकरी मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली. बच्चू कडूंनी स्थानिक प्रशासन, उद्योग क्षेत्र आणि स्थानिक राजकीय व्यवस्थेवर थेट निशाणा साधत रोजगाराच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. गटातटाच्या राजकारणापेक्षा सामान्य माणसाला जिंकण्यावर आपला भर असल्याचे सांगत त्यांनी थेट शिवसैनिकांच्या भाषेत भूमिका मांडली. शहरातील शिवसैनिक व काही पदाधिकाऱ्यांनी मात्र या कार्यक्रमासाठी मोठी मेहनत घेत बच्चूभाऊंचे जल्लोषात स्वागत केले. मात्र, एवढ्या मोठ्या विदर्भ नेत्याचा वणीत कार्यक्रम असताना वणी विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुकाध्यक्षांची उपस्थिती न दिसणे हा मुद्दा आता हॉट ठरला .
विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात वणी विधानसभा शिवसैनिकांचा सहभाग अधोरेखित करण्यात आला असतानाही विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुकाध्यक्ष कार्यक्रमापासून दूर राहिल्याचे चित्र दिसून आले. त्याचबरोबर काही पदाधिकाऱ्यांचीही गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. एका बाजूला शहरातील शिवसैनिकांनी बच्चू कडूंच्या स्वागतासाठी आणि मेळावा यशस्वी करण्यासाठी ताकद पणाला लावली, तर दुसऱ्या बाजूला विधानसभा संघटनेतील प्रमुख चेहऱ्यांची अनुपस्थिती नेमकी कशाचा संकेत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. विदर्भ नेत्याच्या कार्यक्रमालाच स्थानिक नेतृत्वाची अशी ‘दांडी’ कितपत योग्य? हा प्रश्न आता शिवसैनिकांमध्येच चर्चिला जात आहे. ही केवळ वैयक्तिक कारणांमुळे झालेली अनुपस्थिती आहे की संघटनात्मक मतभेद अथवा अंतर्गत नाराजीचे पडसाद, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.
मात्र, बच्चू कडूंच्या कार्यक्रमाला शहरातील कार्यकर्त्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दुसरीकडे तीनही तालुकाध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी यामुळे वणी शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाचा ‘पिक्चर’ सध्या फ्लॉप झाल्याचे बोलल्या जातं आहे. आता ही बाब बच्चू कडूंच्या कानावर कशी जाते आणि विदर्भ नेते म्हणून ते वणीतील संघटनात्मक चित्राकडे कोणत्या नजरेने पाहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

