Ajay kandewar ,Wani – गेल्या काही महिन्यांत झालेली पदांची भरमसाठ घोषणाबाजी ही जरी ‘संघटनवाढ’ म्हणून दाखवली जात असली, तरी स्थानिक पातळीवर वातावरण काही वेगळेच सांगते. सभांमध्ये तेच ते चेहरे, कार्यक्रमांमध्ये हाताची बोटं मोजावी इतकी उपस्थिती आणि तरीही दर आठवड्याला पदांचे नवे फर्मान…पण कार्यकर्त्यांची शून्य उपस्थिती आणि निव्वळ पदांची खैरातच सुरू आहे. हल्ली वणीत पुन्हा एका चौथ्या जिल्हा उपाध्यक्षची निवड करण्यात आली आहे.
•पदाधिकाऱ्यांची भक्कम रांग अन् कार्यकर्त्यांची उपस्थिती शून्य…..
वणीतील भाजपमध्ये सध्या नव्या चेहऱ्यांची भर मोठ्या प्रमाणात होत आहे, पण त्यापैकी बऱ्याच जणांचा पक्षाशी पूर्वीचा काहीच संबंध नसल्याची टीका ऐकू येते.यामुळे “कार्यकर्त्यांना मागे सारून, फक्त पदांचे फोटोसेशन करणाऱ्यांची मिरवणूक सुरू आहे” असे मत गाव-पाड्यांतून पुढे येते.भाजपची परंपरा ‘बूथ ते जिल्हा’ या पिरॅमिडवर उभी राहिलेली.पण आज वणीतील वास्तव असे की,वरचे पदाधिकारी खूप, पण तळाचे कार्यकर्ते अगदी मोजके उरलेले आहे संघटनेचा पाया जसजसा पोकळ होत आहे, तसतसा “हा पक्ष की फक्त पदाधिकारी बहाल करण्याचे यंत्र?” असा प्रश्न अधिक धारदार बनतो. वणीतील भाजप सभांमध्ये लोक कमी आणि फोटो जास्त… काम कमी आणि जाहीरनामे जास्त…याच कारणामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दिवसेंदिवस उफाळून येत आहे.निवडणुका जवळ येत असताना या नाराजीचा परिणाम गंभीर ठरू शकतो, अशी राजकीय चर्चा खुलेआम होते आहे.वणी भाजपाची अवस्था आज अशी का झाली, याचा पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.पदाधिकाऱ्यांची फळी मोठी करून पक्ष वाढत नाही; तो वाढतो घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांवर असते.पदाधिकारी भरपूर; पण कार्यकर्ते दिसत नाहीत.

