Sunday, April 19, 2026
HomeBreakingवणी नॉर्थ वेकोलीचा बेजबाबदारपणा.......

वणी नॉर्थ वेकोलीचा बेजबाबदारपणा…….

खाणग्रस्तांना त्रास, प्रशासन मूकदर्शक भूमिकेत. •सरपंच दिपक मत्ते यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

Ajay kandewar,Wani:- वेकोली वणी नॉर्थच्या बेजबाबदार धोरणामुळे खाण क्षेत्रातील नागरिक, शेतकरी, कामगार, रस्त्यावरून प्रवास करणारे सामान्य प्रवासी यांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. वायू, जल आणि पर्यावरण प्रदूषणाच्या प्रचंड झळा सोसत गावकरी जगण्याची झुंज देत आहेत; परंतु प्रशासनाकडून मात्र सरळ दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांच्या मनात संताप उसळला आहे. यावर गट ग्राम पंचायत, पिंपळगांव (बोरगांव / जुनाड) सरपंच दिपक मत्ते यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

गावकऱ्यांचा आरोप आहे की, वेकोलीकडून जाणीवपूर्वक उपाययोजना टाळल्या जात आहेत. कोळसा वाहतुकीमुळे रस्ते उखडून धुळीचे साम्राज्य पसरले, शेतीपिके नुकसानग्रस्त झाली, पशुधन व जनावरांचा जीव धोक्यात आला; तरीही नुकसानभरपाईचा विषय कायम ठंडगट ठेवल्याचे गंभीर आरोप होत आहेत. निळापूर ते उकणी मार्गावरील (प्र.जि.मा. 73) रस्ता धुळ-खड्ड्याने भरलेला असून, रात्रीच्या वेळेस अपघातांची भीती कायम आहे. रस्त्यालगत काटेरी झुडपांचा प्रचंड फैलाव झाल्यामुळे जंगली प्राणी गावात घुसून हल्ल्यांची मालिका सुरू झाली आहे. अलीकडेच पिंपळगावातील एका शेतकऱ्याची गाय वाघाने ठार केली, हे प्रशासनाच्या ढिलाईचे जिवंत उदाहरण आहे.याहून गंभीर म्हणजे, जुनाळ फाटा–उकणी फाटा मार्ग वेकोलीने बंद करून पर्यायी रस्त्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत नवीन रस्ता बांधला गेला नाही. उलट गावकऱ्यांना शाळा, दळणवळण, शेतीकामासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय ओव्हरबर्डनच्या ढिगाऱ्यामुळे भू-स्खलन व पूरस्थितीचा धोका गावावर कोसळला आहे. डंपिंगचे पाणी थेट गावात घुसत असून नदीच्या प्रवाहालाही अडथळा निर्माण झाला आहे.ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे – “दहा दिवसांत बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने वेकोलीचे कामकाज ठप्प करण्यात येईल.”

वेकोली प्रशासनाचा हा बेजबाबदार कारभार आणि जनतेच्या जीवाशी खेळ करणारी निष्काळजी वृत्ती पाहता ग्रामस्थांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे – “शेतकऱ्यांनी जमीन सरकारला देऊन गुन्हा केला काय?”ग्रामस्थांचे मूलभूत हक्क, आरोग्य व उपजीविका या सर्वच बाबतीत झालेली ही पायमल्ली थांबवली नाही, तर हा संघर्ष उग्र होणार यात शंका नाही.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page