Wani : खरीप हंगाम २०२६ मध्ये यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील भात, सोयाबीन व कापूस पिकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या अवाजवी पीक विमा हप्त्याचा प्रश्न आता थेट मंत्रालयाच्या पातळीवर पोहोचला आहे. कृषिमंत्र्यांच्या निर्देशानुसार या दोन्ही जिल्ह्यांतील पीक विमा हप्ता शेजारील जिल्ह्यांप्रमाणे वाजवी दराने लागू करण्याबाबत मंगळवार, दि. २८ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या प्रश्नावर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून शासनाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी या विषयाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बैठकीस राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार सुधीर मुनगंटीवार, कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, संबंधित संचालक, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, यवतमाळ व चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पीक विमा हप्ता कमी करण्याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता असून, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता या बैठकीवर केंद्रित झाल्या आहेत.

