Ajay Kandewar,Wani :- वणी शहराच्या राजकारणात आपल्या अभ्यासू राजकीय रणनीती, संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांवरील पकड आणि शिवसेनेप्रती असलेल्या निष्ठेमुळे स्वतंत्र ओळख निर्माण करणारे कट्टर शिवसैनिक मनिष सुरावार यांचा आज (७ जुलै) वाढदिवस ….. सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या मनिष सुरावार यांनी कोणत्याही पदाचा मोह न बाळगता कार्यकर्ता म्हणून समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. वणी शहरात त्यांची ओळख केवळ शिवसैनिक म्हणून नसून, राजकारणातील अभ्यासू ‘चाणक्य’, स्थानिक राजकारणातील प्रभावी ‘किंगमेकर‘ आणि शिवसेनेचा ‘ढाण्या वाघ‘ अशी केली जाते. अनेक राजकीय घडामोडींमध्ये पडद्यामागे राहून रणनीती आखणारा, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणारा आणि निर्णयक्षम नेतृत्व करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
मनिष सूरावार यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९९६ मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. विद्यार्थी हितासाठी त्यांनी अनेक आंदोलने, संघर्ष आणि जनआंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात मनसेची संघटन उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे ७ जुलै २००९ रोजी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करून जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा घडवून आणली. भाजपचे जिल्हा सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. मात्र राजकीय घडामोडींनंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेची वाट निवडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि शिवसेनेत सक्रियपणे कार्य सुरू ठेवले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ते आजही संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
वणी शहरातील नगरपालिकेच्या राजकारणात मनिष सुरवार यांचे नाव विशेष प्रभावाने घेतले जाते. स्थानिक राजकीय वर्तुळात त्यांना ‘नगरपालिकेचा किंगमेकर’ म्हणून संबोधले जाते. नगराध्यक्षपदाच्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांची भूमिका प्रभावी राहिल्याची चर्चा समर्थकांमध्ये कायम होत असते. कोणत्याही राजकीय समीकरणाचा अचूक अभ्यास, योग्य वेळी योग्य निर्णय आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करण्याचे कौशल्य यामुळे ते स्थानिक राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणूनही ओळखले जातात. पदापेक्षा संघटनाला महत्त्व देणारा आणि पडद्यामागे राहूनही प्रभावी भूमिका बजावणारा नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.
शिवसेनेप्रती असलेली त्यांची निष्ठा ही त्यांच्या राजकीय प्रवासाची सर्वात मोठी ताकद मानली जाते. पक्षातील प्रत्येक आंदोलन, संघटनात्मक कार्यक्रम, जनसंपर्क मोहीम आणि सामाजिक उपक्रमांमध्ये ते कायम आघाडीवर दिसतात. कार्यकर्त्यांना बळ देणे, युवकांना पक्षाशी जोडणे, गरजूंच्या मदतीसाठी तत्पर धावून जाणे आणि सर्वसामान्य नागरिकांशी सतत संपर्क ठेवणे ही त्यांची कार्यशैली आहे. म्हणूनच वणी शहरात मनिष सुरवार यांची ओळख केवळ एका नेत्यापुरती मर्यादित नसून ‘कट्टर शिवसैनिक’, ‘ढाण्या वाघ’, ‘राजकीय चाणक्य’ आणि ‘किंगमेकर’ अशी झाली आहे. पक्षनिष्ठा, धाडसी भूमिका आणि संघटनात्मक बांधिलकीमुळे शिवसेनेतील त्यांचे स्थान अधिक भक्कम झाल्याचे कार्यकर्ते सांगतात.
आज त्यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, गरजू नागरिकांना मदत, सामाजिक उपक्रम तसेच विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसैनिक, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना शुभेच्छा देत आहेत. संघर्षातून घडलेले नेतृत्व, अभ्यासपूर्ण राजकीय रणनीती, शिवसेनेवरील निष्ठा आणि सामान्य माणसाशी जपलेले घट्ट नाते या बळावर मनिष सुरावार यांनी वणी शहराच्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
मनिष सुरावार यांची “चाणक्य नीतीचे किंगमेकर” म्हणून ओळख…
नगराध्यक्षपदाच्या प्रत्येक निवडणुकीत यांचे राजकीय गणित निर्णायक ठरत असे.वणी नगरपरिषदेच्या राजकारणात त्यांनी आपल्या दूरदृष्टी, संयम आणि अचूक रणनीतीने अनेक वेळा नगराध्यक्ष घडवले.राजकीय डावपेचांवर असलेले त्यांचे प्रभुत्व पाहून त्यांना “चाणक्य नीतीचे किंगमेकर” म्हणून ओळख मिळाली.त्यांच्या शब्दाला आणि निर्णयाला राजकीय वर्तुळात विशेष वजन व मान होता.वणीच्या राजकारणातील हा “ढाण्या वाघ” आजही प्रभावी नेतृत्व, रणनीती आणि राजकीय कौशल्याचे प्रेरणादायी प्रतीक मानला जातो.

