Ajay Kandewar, Wani :— छत्तीसगडमधून स्वस्त दरात आणला जाणारा रिजेक्ट कोल चांगल्या कोळशात मिसळून खुलेआम विक्री करणाऱ्या कोल माफियांची आता गर्दन अडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाने प्रदूषणकारक असल्याने रिजेक्ट कोलची विक्री केवळ एंड युझरपुरती मर्यादित केली असताना, वणी—चंद्रपूर परिसरातील काही कोळसा व्यापारी मात्र नियमांची सरळ पायमल्ली करत आहे.
मात्र या अवैध धंद्याची आता पोलखोल झाली असून, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार यवतमाळ पोलिसांच्या विशेष पथकाने लालपुलीया परिसरात सर्च केली. काही कोल डेपोवर तपासणी करण्यात आली असून, अवैधरित्या ट्रान्सपोर्ट व विक्री करण्यात येणाऱ्या रिजेक्ट कोलच्या रॅकेटचा धागा पोलीसांच्या हातात लागल्याची माहिती समोर येत आहे.सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून, या काळ्या धंद्यामागील मुख्य सूत्रधारांची नावे लवकरच बाहेर पडणार असल्याच्या चर्चा स्थानिक पातळीवर जोरात आहेत. या कारवाईनंतर वणीतील कोळसा तस्करी व मिश्रण व्यवसायावर मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.प्रशासनाच्या या धडाकेबाज हालचालीमुळे कोळसा माफियांच्या कपाळावर आठ्या—आणि बाजारपेठेत खळबळ माजली आहे.

