Ajay Kandewar, Wani :कोरोनासारख्या भीषण महामारीत जीवाची पर्वा न करता ग्रामपातळीवर काम करणाऱ्या वणी तालुक्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा प्रोत्साहन भत्ता अद्यापही वितरीत न झाल्याने तीव्र नाराजीचा विषय बनला आहे. तालुक्यातील एकूण १७६ आशा स्वयंसेविका आणि ९ गटप्रवर्तकांनी मिळून १८५ कर्मचाऱ्यांनी या संदर्भात माजी जि.प.सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले आहे.
कोविड-१९ च्या गंभीर परिस्थितीत नागरिकांना मदत, सर्वेक्षण, घराघरांत भेटी, आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा जबाबदाऱ्या पार पाडताना आशा व गटप्रवर्तकांनी दिवस-रात्र अथक परिश्रम घेतले. शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या २४ महिन्यांसाठी प्रतिमहिना १,००० रुपयांच्या प्रोत्साहन भत्त्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चंद्रपूर जिल्ह्यासह अन्य ठिकाणी अंमलात आणण्यात आला असतानाही वणी तालुक्यातील कर्मचाऱ्यांना मात्र आजतागायत हा भत्ता मिळालेला नाही.
ग्रामविकास विभागाचे परिपत्रक, तसेच जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला आणि तालुका प्रशासनाने ग्रामपंचायतींना दिलेल्या सूचनांनंतरही भत्ता वितरणात विलंब होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शासनाचा स्पष्ट आदेश आणि निधीचे स्रोत उपलब्ध असताना ग्रामपंचायतींकडून टाळाटाळ केली जात असल्याने कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम केले, तेव्हा प्रशासनाने कौतुक केले; पण भत्ता देताना दुर्लक्ष होत असल्याची भावना आशा व गटप्रवर्तकांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपासून प्रोत्साहन भत्ता प्रलंबित राहणे ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा. कर्मचाऱ्यांनी निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रोत्साहन भत्ता तातडीने वितरित न झाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला.कोविडकाळातील त्यांच्या निःस्वार्थ सेवेला न्याय मिळावा, अशी सर्वांनीच अपेक्षा व्यक्त केली आहे.

