Ajay Kandewar, वणी : तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकामध्ये नैसर्गिक बदल होऊन मोठ्या प्रमाणात दाणे काळपट, रंग उतरलेले दिसत आहेत. हा बदल पूर्णपणे नैसर्गिक असून त्यात शेतकऱ्यांचा कोणताही दोष नसतानाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) तपासणी अधिकारी किरकोळ दोष काढून शेतकऱ्यांचा माल अयोग्य ठरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.यामुळे शेतकऱ्यांना पिक परत घरी नेण्याची वेळ येत आहे किंवा अत्यल्प दराने खाजगी व्यापाऱ्यांकडे विकावा लागत आहे. या अन्यायकारक परिस्थितीवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे झालेला रंगबदल हा नैसर्गिक असल्याने त्याला दोष म्हणून धरू नये. ज्या पद्धतीने कपाशी पिकाचे दर्जानुसार (Quality Grade) भाव निश्चित केले जातात, त्याच धर्तीवर यावर्षीच्या सोयाबीन पिकालाही रंग, ओलावा आणि गुणवत्तेनुसार हमीभाव देण्यात यावा.शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सोयाबीन खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. शेतकऱ्यांच्या गंभीर अडचणीची दखल घेऊन प्रशासन त्वरित कार्यवाही करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे .यावेळी प्रमोद कोल्हे,लकी सोमकुवर, प्रवीण कळसकर, नितीन चहाणकर ,रवी वनकर, रुपेश पेचे ,धीरज भगवा, संतोष गोंडे, धीरज पेचे, आशिष चहाणकर, आशिष ठावरी ,सुरज काकडे, प्रशांत शेंडे व अमोल लांबट हे उपस्थित होते.

