गौराळा फाट्यासमोवरील घटना
नागेश रायपुरे,मारेगाव:- वणी वरुन साळ्याचा विवाह आटोपून दुचाकीने मारेगाव येथे सासुरवाडीला येत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जावयाचा घटना स्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २८ डिसेंबरचे संध्याकाळी साडेसात वाजतेच्या दरम्यान वणी-यवतमाळ महामार्गावर गौराळा फाट्या समोर घडली. विनोद किसन परचाके (४५) रा.सोनेगाव ता.वणी असे मृतकाचे नाव आहे.
मारेगाव शहरातील प्रभाग ८ मधील घनश्याम चांदेकर यांचा विवाह वणी येथील धनोजे कुणबी कार्यालयात आज संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला नवरदेवाचे भाऊजी विनोद किसन परचाके (४५) रा. सोनेगाव हे उपस्थित होते.साळ्याचे लग्न आटोपून भाऊजी स्वताच्या मोटारसायकलने सासुरवाडी मारेगाव ला संध्याकाळी साडेसात वाजतेच्या दरम्यान येत होते.
याच दरम्यान वणी-यवतमाळ या राज्य मार्गावरील गौराळा फाट्या समोर डॉ जुमानाके फार्म हाऊस समोर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.या धडकेत जावई विनोद परचाके जागीच ठार झाले. धडक दिलेले अज्ञात वाहन घटनास्थळा वरून पसार झाले आहे.
अपघाताचे वृत्त कळताच लग्न घरी दुःखाचा डोंगर कोसळला. उपस्थितांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे आणला आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे.