Ajay, Wani : मोहदा येथील राजेंद्र ज्वेलर्समधील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष मनवर यांचा स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा पोलीस दलाकडून गौरव करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते मनवर यांना पदक व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
दि. १५ जुलै रोजी मोहदा येथील राजेंद्र ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. प्रत्यक्ष घटनास्थळी मर्यादित पुरावे असतानाही उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण करत संशयितांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान तपास पथकासमोर होते.याच टप्प्यावर संतोष मनवर यांनी तांत्रिक तपासाला प्रत्यक्ष तपासाची जोड देत महत्त्वाचे धागेदोरे जोडले. माहितीचे विश्लेषण, संशयितांची हालचाल आणि उपलब्ध पुराव्यांचा मागोवा घेत तपास पुढे नेण्यात आला. अखेर पुणे जिल्ह्यातील तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. त्यांच्याकडून ६० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
या कारवाईतून केवळ चोरीचा गुन्हा उघडकीस आला नाही, तर तपासाची व्याप्ती वाढवत मोठ्या किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या कामगिरीची दखल घेत संतोष मनवर यांच्या तपासातील दक्षता, चिकाटी आणि निर्णयक्षमतेचा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र मनवर यांना प्रदान करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते मिळालेले पदक आणि प्रशस्तीपत्र हे शिरपूर पोलीस ठाण्याच्या कामगिरीतील उल्लेखनीय नोंद ठरले आहे.

