Ajay, Wani : देशाच्या स्वातंत्र्याचा गौरव, राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान आणि देशाप्रती असलेली निष्ठा अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वणीत भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. विश्रामगृहापासून सुरू होणारी ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, संत गाडगेबाबा चौक, वीर भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, रवींद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे लो. टिळक चौकापर्यंत पोहोचणार आहे.
ही रॅली केवळ एका संस्था किंवा घटकापुरती मर्यादित नसून समस्त देशभक्त नागरिकांची रॅली म्हणून आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक संस्थांसह युवक-युवती आणि सर्व नागरिकांनी सहभागी होऊन तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमाची भावना अधिक बळकट करावी, हा या उपक्रमामागील व्यापक हेतू आहे. ‘एक राष्ट्र, एक भावना आणि तिरंग्याचा सन्मान’ या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

