Ajay wani : वणी उपविभागातील प्राथमिक शाळांमध्ये सुमारे ३०० शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर ताण निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक शाळांमध्ये उपलब्ध शिक्षकांवर एकाच वेळी विविध वर्गांच्या अध्यापनाची जबाबदारी येत आहे. त्यातच बीएलओ, एसआयआर, जनगणना तसेच इतर प्रशासकीय आणि अशैक्षणिक कामे शिक्षकांकडे सोपविली जात असल्याने प्रत्यक्ष अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचा मुद्दा पुढे आला आहे.
शिक्षकांची कमतरता ही केवळ प्रशासकीय रिक्त पदांची आकडेवारी नसून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. विशेषतः ग्रामीण आणि शेतकरी-कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थी प्रामुख्याने सरकारी शाळांवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत शिक्षकांची पदे दीर्घकाळ रिक्त राहिल्यास विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक भरती आणि रिक्त पदांचे समतोल वाटप हा प्रश्न तातडीने हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी संबंधित विभागाकडे वणी उपविभागातील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत वणी उपविभागातील सर्व रिक्त जागांचा प्राधान्याने विचार करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. २ ऑगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास विद्यार्थी आणि पालकांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शाळा भरवून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

