● राजूर येथे बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमातील सूर
वणी : “शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या संघर्ष हा या देशातील मूळ निवासीयांना त्यांच्या ” जल, जंगल व जमिनीवरील” अधिकार हा नैसर्गिक असल्याने तो कुणीही हिसकावून घेऊ नये, यासाठी होता. आज आपल्या देशाला स्वातंत्र्याची 75 वर्षे लोटून अमृत महोत्सव साजरा करीत असताना मात्र आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. जल, जंगल व जमिनीवर मूठभर धनदांडग्यांच्या कब्जा वाढत असून पिढ्यानपिढ्या जंगल व जमिनीवर राहत असलेल्या मूळ निवासीयांना हाकलुन लावल्या जात आहे. संविधानाने दिलेल्या शिक्षण, आरोग्य व रोजगार ह्या मूलभूत अधिकाराला सत्ताधारी केराची टोपली दाखवीत आपल्या जवाबदारी पासून हात झटकत आहेत. या साठी जनतेने आपल्या मूलभूत अधिकाराच्या पूर्ततेसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे व हा संघर्ष करणेच म्हणजे खऱ्या अर्थाने शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या कार्याला पुढे नेणे होय आणि तसा संकल्प करून कार्याला लागणे म्हणजेच त्यांचा जयजयकार होय”, असा सूर राजूर येथे झालेल्या शहीद वीर बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात वक्त्यांकडून करण्यात आला.
राजूर येथील शहीद बिरसा मुंडा नगरामध्ये बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रम घेण्यात आला. या जयंती कार्यक्रमाला माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, लीलाधर आरमोरीकर, पो. पा. सरोज मून, कॉ. नंदकिशोर लोहकरे, सतपाल गाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम जनाबाई सुरपाम, प्रेमीलाबाई आत्राम, ताराबाई मडकाम, वंदना उईके, छाया पेंदोर व उपस्थित महिलांचे हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर सतपाल गाडे यांचे हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, तर नाना सुरपाम यांचे हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यानंतर कॉ. कुमार मोहरमपुरी, लीलाधर आरमोरीकर, पो.पा. सरोज मून, कॉ. नंदकिशोर लोहकरे यांचे मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमाला बिरसा मुंडा नगरातील अनेक स्त्री पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांना सुग्रास मसाला भात खाऊ घालण्यात आला. जल, जंगल, जमीन आमच्या हक्काची , नाही कोणाचा बापाची, बिरसा मुंडा जिंदाबाद, उलगुलान जिंदाबाद च्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आकाश कोवे, जगन सुरपाम, किसन किनाके, गाडे, सत्तू उईके, नंदू केराम, केतन केराम, आकाश केराम, गणेश कोवे आदींनी अथक परिश्रम घेतले.