Ajay Kandewar, Wani :- गर्भवती मातांचे आरोग्य आणि भविष्यातील पिढीचे मानसिक स्वास्थ्य अधिक सक्षम करण्यासाठी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ‘गर्भसंस्कार व डोहाळे जेवण’ हा उपक्रम राबवावा, अशी ठाम मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या तथा मनसे महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा अलका टेकाम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने कार्यवाहीची विनंती केली.
अलका टेकाम यांनी सांगितले की, आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीमुळे गर्भवती मातांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. योग्य आहार, सकारात्मक वातावरण आणि समुपदेशन यामुळे गर्भातील बाळाच्या सर्वांगीण विकासास चालना मिळू शकते. ‘गर्भसंस्कार’ उपक्रमाच्या माध्यमातून मातांना आवश्यक मार्गदर्शन देऊन निरोगी आणि सक्षम पिढी घडविण्याचा प्रयत्न व्हावा, असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात गरोदर मातांना पोषण, लोहयुक्त आहार, वैयक्तिक स्वच्छता, नियमित तपासणी आणि लसीकरण याबाबत माहिती देण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचवून बालमृत्यू व कुपोषण कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्ह्यातील सर्व तालुके आणि ग्रामपंचायती स्तरावर हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, अशी मागणी करत अलका टेकाम यांनी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे माता व बाल संगोपनाच्या प्रश्नाला नव्याने अधोरेखित करण्यात आले आहे.

