Ajay Kandewar,Wani :- शहरातील टागोर चौकात असलेला आणि प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांचा जीवनाधार असलेला ट्यूबवेल दुरुस्तीच्या नावाखाली उघडून ‘collaps झाला’ असे सांगत थेट बुजवण्यात आल्याची घटना म्हणजे भाजपाच्या तथाकथित विकासाच्या दाव्यांवर बसलेली जोरदार चपराक आहे. शहरात विकासाच्या घोषणा दिल्या जात असताना, लोकांच्या पिण्याच्या पाण्यावरच कुऱ्हाड चालवली जात असल्याचा संतापजनक आरोप नागरिकांकडून होत आहे
.
हाच तो पाणी पुरवठा करणारा ट्यूबवेल
हा ट्यूबवेल अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांची तहान भागवत होता. मात्र अचानक दुरुस्तीचा बहाणा पुढे करून तो उघडण्यात आला आणि काही वेळातच दुरुस्ती शक्य नसल्याचे सांगत बुजवण्यात आला. या निर्णयामागे तांत्रिक अडचणी कमी आणि राजकीय सोयी जास्त असल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे. भाजपाच्या एका प्रभावी पदाधिकाऱ्याचे खाजगी काम सुरू असून, त्या कामात ट्यूबवेल अडथळा ठरत असल्यानेच हा पाणीपुरवठ्याचा स्रोत संपवण्यात आल्याचा गंभीर आरोप शहरात सर्वत्र ऐकू येत आहे.या संपूर्ण प्रकाराला माजी आमदारांचा आशीर्वाद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये पसरल्याने संताप आणखी वाढला आहे. सत्तेचा वापर लोकांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालण्यासाठी होत असेल, तर तो विकास नसून उघड्या डोळ्यांनी केलेला अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. भाजपाने शहरात नेमका कोणाचा विकास केला, हा प्रश्न आता रस्त्यावर विचारला जाऊ लागला आहे.
पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेचा बळी खासगी कामासाठी देण्यात येत असेल, तर सामान्य नागरिकांनी कुठे जायचे, असा सवाल प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिक उपस्थित करत आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांची तहान भागवण्याऐवजी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांची सोय पाहणे, ही लोकशाहीची थट्टा असल्याचे मत उघडपणे व्यक्त होत आहे.या घटनेमुळे भाजपाचा विकासाचा मुखवटा गळून पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विकासाच्या नावाखाली सार्वजनिक सुविधा संपवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत नागरिक आता आक्रमक होत आहेत. येत्या काळात या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन होण्याची शक्यता असून, टागोर चौकातील हा ट्यूबवेल प्रकरण भाजपाच्या सत्तेच्या राजकारणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

