अजय कंडेवार,वणी : मागील अनेक दिवसांपासून राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार, डॉक्टरांची नियमित अनुपस्थिती, रुग्णांची होत असलेली हेळसांड आणि कर्मचाऱ्यांचा विस्कळीत कारभार यामुळे संपूर्ण PHC चा कारभार अक्षरशः “सलाईनवर” गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. “विदर्भ न्यूज पोर्टलने” सातत्याने या गंभीर प्रकाराला वाचा फोडल्यानंतर अखेर जिल्हा आरोग्य प्रशासनाला जाग आली असून कामचुकारपणा व मुजोरीमुळे चर्चेत आलेले कामचुकार डॉ. राहुल चिखलीकर आणिआळशी डॉ. तेजस आस्वले आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या दोन्ही डॉक्टरांच्या कारभारामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी (D.H.O.) ढोले यांनी चौकशी समिती नियुक्त केली असून येत्या सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “राजूर PHC संदर्भातील तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा D.H.O. ढोले यांनी माध्यमांशी बोलताना दिला. विशेष म्हणजे, स्थानिक THO समीर थेरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वारंवार तक्रारी होऊनही त्यांनी ठोस भूमिका का घेतली नाही? असा सवाल आता जोर धरू लागला आहे.
दरम्यान, राजूर PHC मधील या संपूर्ण प्रकारामुळे यवतमाळ जिल्हाभरात संतापाची लाट उसळली असून “त्या दोन मुजोर डॉक्टरांवर” कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. रुग्णसेवेपेक्षा बेफिकीरपणा आणि मनमानी कारभारामुळे चर्चेत आलेल्या या डॉक्टरांवर आता प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

