अजय कंडेवार,वणी:- मतदारांच्या बोटाला शाई लावून पैसे वाटप करण्याचा प्रकार वणीतही होऊ शकतो, अशी खळबळजनक माहिती शिवसेना उबाठा चे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी सकाळी १२ वाजता वणी विधानसभा मतदारसंघाचे मविआ शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजय देरकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र गायकवाड यांनी वरिल माहिती दिली आहे. त्यांनी माहिती देताना सांगितले की, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
परिसरामध्ये एका पक्षाची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहीत होती व त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशांचे वाटप केले जात होते. विशिष्ट भागातील हे मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला असता एका राजकीय पक्षाची मंडळी त्या ठिकाणाहून पळून गेली. मात्र बोटाला लावल्या जात असलेली शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर भरारी पथकाच्या हाती लागले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली होती. असाच प्रकार वणीतही होऊ शकतो तशी माहितीही मिळाली आहे असे ते म्हणाले. आम्ही शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चार टिम तयार केल्या असून आमची पाळत असणार आहे याबाबत आम्ही येथिल निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती देणार आहे यावर सुमोटो कारवाई व्हायला हवी, याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास आम्ही मात्र नक्की घेऊ, अशी माहिती राजेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास, अमोल धोपेकर, राजु तुराणकर, रवी बोढेकर, गोपी पुरावार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.