Ajay Kandewar,Wani:- भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जि.प. मराठी प्राथमिक शाळा, पठारपूर येथे जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, घोषणाबाजी व पताका घेऊन गावातील प्रमुख मार्गावरून भव्य रॅली काढली. गावातील चौकात स्थापित बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे पूजन व माल्यार्पण करून रॅलीचे शाळेत विसर्जन करण्यात आले.
रॅलीनंतर शाळेत आयोजित कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी रमेश बोबडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख गजानन भगत, ग्रामसेवक खोके, अंगणवाडी सेविका संध्या कुमरे, आशा वर्कर शिल्पा कुळमेथे, मदतनीस जयश्री कुमरे व माधुरी गारघाटे उपस्थित होते.मुख्याध्यापक सुरेश बदखल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा मांडली. प्रकाश तालावार यांनी सुत्रसंचालन केले तर मंगेश सुरपाम यांनी आभार मानले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी सांस्कृतिक परंपरा दर्शविणारी आकर्षक गीते व नृत्य सादर केली. गावातील नागरिक, महिला व पुरुषांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरव केला. उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांसाठी अंगणवाडी सेविका संध्या कुमरे व जयश्री कुमरे यांच्या वतीने जिलेबी आणि खाराभाताचे स्नेहभोजन ठेवण्यात आले.अध्यक्ष रमेश बोबडे व प्रमुख अतिथी गजानन भगत यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व जनजाती गौरव दिनाबद्दल समाधान व्यक्त केले.
भगवान बिरसा मुंडा कोण?
इंग्रजांचा अत्याचाराविरोधात उभे राहिलेले महान स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि जनजातीय नेतृत्व करणारे बिरसा मुंडा हे आदिवासी समाजातील प्रेरणास्थान मानले जातात. जमातींच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेल्या या योद्ध्याला ‘धरती आबा’ म्हणून गौरवले जाते.

