•परस्परविरोधात ठाण्यात गुन्हे दाखल.
•त्या बार विरोधात कारवाई होईल का ? एक्साइज विभाग मुंग गिळून
अजय कंडेवार,वणी:- शहरातील वरोरा रोड वरील बारमध्ये गुरुवारी ता 22 फेब्रुवारी रोजी रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याने या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रात्री 11 .30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
शेख अजहर मो. शफी (३५) रा. शास्त्री नगर याने दिलेल्या फिर्यादीवरून तो व त्याचे मित्र बियरबारमध्ये बसून मद्य सेवन करीत असतांना तेथेच छोटू रॉय व त्याचे मित्र देखील मद्य सेवन करीत होते. काही वेळाने छोटू रॉय हा अजहर व त्याचे मित्र बसून असलेल्या टेबलकडे आला, व अजहरला दारू पाजण्याकरिता आग्रह धरू लागला. परंतु अजहरने त्याचा दारूचा खर्च करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे छोटू रॉयने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. छोटूने वाद घालताच त्याचे मित्रही धावून आले. आणि त्यांनी अजहर व त्याच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणी दरम्यान छोटूने टेबलवर ठेऊन असलेली बियरची बॉटल अजहरच्या डोक्यावर मारली. त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याने झालेल्या मारहाणीबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. अजहर शेख याच्या तक्रारी वरून पोलिसांनी छोटू रॉय (३२) रा. कुंभारखनी, राहुल चिंचोलकर (२३) इंदिरा चौक, जमीर उर्फ मेहबूब शेख (२९) रा. मेघदूत कॉलनी या आरोपींवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर राहुल चिंचोलकर याच्या तक्रारी नुसार तो आपल्या मित्रांसोबत बियरबारमध्ये दारू पीत असतांना समोरच्या टेबलवर दारू पित असलेल्या अजहर व त्यांच्या मित्रांकडे छोटू रॉय गेला. त्यांच्यात काही वेळ चर्चा झाल्यानंतर अचानक वाद उफाळून आला. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून राहुल चिंचोलकर व त्याचा मित्र मध्यस्थी करण्यास गेला असता अजहरने टेबलवर ठेऊन असलेली बियरची बॉटल राहुलच्या डोक्यात हाणली. यात तो जखमी झाला असून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याबाबत त्याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अजहर शेख (३५), सलमान शेख (३३), अशपाक शेख (३६) तिघेही रा. शास्त्री नगर यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.
“वणी शहरातील बार दुकाने चोरट्या मार्गाने मध्यरात्री पर्यंत सुरू असल्याची माहिती आहे. मात्र संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने दारू विक्रेते बिनदिक्कत बार व दुकाने चालवत आहेत. वेळ कितीही असली तरी बार मध्यरात्रीपर्यंत उघडे राहतात. बहुतांश बिअर शॉपीधारकांनी देखील ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. एमआरपी दरापेक्षा जास्त पैसे ग्राहकांकडून वसूल केले जात असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे लक्ष देत नाही. सध्या या विभागावर नियम डावलून दारू दुकानांना मान्यता दिल्याच्या आरोपांनी घेरले आहे.”