अजय कंडेवार ,वणी : – गणेशोत्सव काळात शहर व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वणी पोलीस प्रशासनाने सर्वंकष तयारी केली आहे. गुन्हेगारी घटना तसेच वाहतुकीतील अनुशासन यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून पोलीस यंत्रणा पूर्णतः अलर्ट मोडवर आहे.गणेशोत्सवाच्या श्र्वभूमीवर जिल्हा पोलिसांचे विशेष लक्ष असलेल्या वणी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्ताची तयारी केली . यंदा शहरामध्ये ३३ तर ग्रामीण भागात २५ अशी एकूण ५८ गणेश मंडळे स्थापन करण्यात आले. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी, डझनभर अधिकाऱ्यांसह विविध राखीव पथके तैनात केले .

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, मंदिर परिसर, गणेश मंडळे याठिकाणी विशेष गस्त घालण्यात येईल. मोठ्या मंडळांच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात राहणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही देखरेख ठेवली जाणार आहे.पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांना विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचे मनुष्यबळ वाढविण्यात आले.तसेच महिला सुरक्षा, अनधिकृत वाहनतळ, रात्र गस्त आणि मद्यप्राशनावरील नियंत्रण यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली .
पोलीस प्रशासनाने नागरिक, गणेश मंडळांचे कार्यकर्ते व स्वयंसेवकांना शांतता, सौहार्द व अनुशासन राखण्याचे आवाहन केले आहे. “गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि ऐक्याचा सण आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच तो सुरक्षित व सुरळीत पार पडेल,” असे आवाहन वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार उंबरकर यांनी केले.
•राखीव दलांच्या तुकड्या तैनात……
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी, पोलिसांचे १० अधिकारी, शहर चे १०० कर्मचारी,स्ट्राइकिंग फोर्स एक कंपनी, एक आरसीपी पथक, ६० होमगार्ड यासह राखीव फोर्स तैनात करण्यात आली आहे. याशिवाय अजूनही काही राखीव पथके दाखल झाले.अशाप्रकारे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

